Monday, February 14, 2011

इजिप्त क्रांतीचा नवा नायक

'ज्यांची मुले या आंदोलनात मारली गेली, त्या प्रत्येक माता-पित्याची मी जड अंतःकरणाने माफी मागतो. मात्र ही आमची चूक नाही. जे सत्तेत ठाण मांडून बसले आहेत, तो प्रत्येक जण याला जबाबदार आहे. त्यांना सत्ता सोडावीशी वाटतच नाही.'' वेल घोनिम या तरुणाची दूरचित्रवाणीवाहिनीवरील ही मुलाखत ऐकताना सारा इजिप्त हेलावून गेला. कैरोच्या ताहरीर चौकात जमलेल्या लाखो निदर्शकांमध्ये लढ्यासाठी नवा जोम संचारला. कोण हा वेल घोनिम? तीस वर्षीय घोनिम हा या क्रांतीचा "नायक'च ठरला आहे.

1980 मध्ये इजिप्तमध्ये जन्मलेला घोनिम हा सध्या "गूगल' या सर्च इंजिनचा पश्‍चिम आशियाई देशांचा मार्केटिंगचा प्रमुख. तो लहानाचा मोठा झाला संयुक्त अरब अमिरातमध्ये. कैरो विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यानंतर अमेरिकी विद्यापीठातून त्याने एमबीए केले. त्यानंतर इजिप्त सरकारची वेबसाईटही त्यानेच डिझाईन केली. मुक्त जगाचा अनुभव घेतलेल्या; तसेच ट्विटर, फेसबुक वापरणाऱ्या तरुण पिढीचा प्रतिनिधी असलेल्या घोनिमला देशातील हुकूमशाही मनातून डाचतच होती. त्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उत्कृष्ट करिअरची संधी हातात असताना मायदेशात गुप्तपणे क्रांती घडविण्याचा मार्ग पत्करला. यासाठी त्याने दुबईतून कैरोत बदली मागून घेतली. 25 जानेवारीस त्याने फेसबुकवर "वुई आर ऑल खलीद सैद' हे पेज तयार केले. अलेक्‍झांड्रिया शहरात खलीद हा 28 वर्षीय तंत्रज्ञ पोलिस अत्याचाराचा बळी ठरला होता. फेसबुकवरील या पेजला साऱ्या अरब जगतातून अफाट प्रतिसाद मिळाला. रात्रंदिवस जागून घोनिम फेसबुकवर प्रतिक्रियांना प्रतिसाद देत होता. फारच थोड्या लोकांना ही बाब माहिती होती. 27 जानेवारीस त्याने "प्रे फॉर इजिप्त' असा मेसेज ट्‌विटरवर टाकला. त्याचा मेसेज वाचून हजारो तरुणांची पावले आपसूकच आंदोलनासाठी घराबाहेर पडत होती. त्याच दिवशी रात्री त्याला अटक झाली. 28 तारखेस ताहरीर चौकाकडे निघालेल्या निदर्शकांवर तुफान लाठीमार झाला. अश्रुधुराचा वापर करण्यात आला. घोनिमचे मित्र, पत्नी तसेच "गूगल'ने त्याच्या शोधासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. तब्बल आठवड्यानंतर विरोधी पक्षाचे नेते मुस्तफा अल्नागर यांनी घोनिम जिवंत असून, सरकारने त्याला अटक केल्याचा गौप्यस्फोट केला आणि साऱ्या देशात जनक्षोभ उसळला.

"ऍम्नेस्टी इंटरनॅशनल'ने त्याच्या सुटकेची मागणी केली. अखेर सरकारला त्याला सात फेब्रुवारीस तुरुंगातून सोडणे भाग पडले. तब्बल दहा दिवसांच्या कोठडीतून घोनिम बाहेर पडला तो इजिप्तचा नवा "हिरो' होऊनच. व्यक्ती, संघटना आणि पक्ष यांच्यापेक्षा देश मोठा, हे त्याने अत्यंत प्रभावीपणे आंदोलकांच्या मनावर बिंबवले... अन्‌ इजिप्तच्या नव्या पिढीला आपला नेता गवसला.

- धनंजय बिजले 

                                                           
   - सदर लेख दै.सकाळ मधून संकलित केला आहे.

0 Comments:

.

.

विद्रोही विचार मंच | संभाजी ब्रिगेड विचारपीठ