Tuesday, February 15, 2011

जब क्रिकेट मेट बॉलिवूड !

ल्पना करा, तुम्ही चॅनेल "सर्फिंग' करताय! कुठं एखादी नवीन हिट फिल्म दिसतीय, तर कुठं एखादा जुन्या जमान्यातला "क्‍लासिक' चित्रपटही सुरूय. कुठं क्रिकेटची लाईव्ह मॅच रंगात आलीय; तर कुठं "वर्ल्ड कप'च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. मात्र, एक चॅनल असं दिसलं की ज्यावर कपील देव आणि सचिन तेंडुलकर आजूबाजूला बसलेत आणि त्यांच्यासमोर आहेत त्या शर्मिला टागोर आणि दीपिका पदुकोन. हे चौघं एकमेकांशी त्यांच्या चित्रपट आणि क्रिकेटप्रेमाविषयी गप्पा मारताहेत. अर्थातच या चॅनलवर स्थिरावलेलं आपलं रिमोटचं बटण या "सेलिब्रिटीं'मधल्या गप्पा संपेपर्यंत काही दाबलं जाणार नाही. थोडक्‍यात, क्रिकेट आणि बॉलिवूड हे दोन घटक आपल्या रक्तात इतके भिनले आहेत की, त्यांच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकणार नाही. भारतीय मनोरंजन-उद्योगाचे हे दोन भिन्न चेहरे; परंतु, या दोन चेहऱ्यांमध्ये आपण सतत आपला चेहरा पाहत असतो. त्यावर आपल्या ज्या काही बऱ्या-वाईट प्रतिक्रिया असतील, त्या अगदी पोटतिडकीनं मांडत असतो. म्हणूनच या दोन क्षेत्रांमध्ये अत्युच्च कार्य करणाऱ्यांना आपण देवस्थानी नेऊन ठेवलंय.

सचिन-आमिरची अनोखी मैत्री
एक किस्सा माझ्या चांगलाच लक्षात आहे. साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीची ही घटना असेल. तो मकरसंक्रांतीचा दिवस होता. याच दिवशी भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेटची "वन डे' मॅच सुरू होती. एका "फाईव्ह स्टार' हॉटेलमध्ये अभिनेता गोविंदाच्या चित्रपटाचं शूटिंग "कव्हर' करण्यासाठी मी गेलो होतो. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि इतर कलाकार मंडळी क्रिकेटची "फॅन' होती. दिग्दर्शकानं काही प्रसंगांचं चित्रीकरण झटपट आटोपून घेतलं आणि हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेत टीव्ही संच लावून घेतला.

ही मॅच पाहण्यात सगळे इतके गुंग झाले होते की, इथं शूटिंग सुरू आहे, याचा सगळ्यांना विसर पडला होता. ही मॅच संपल्यानंतरच मग पुन्हा शूटिंग सुरू झालं. हा झाला एक प्रातिनिधिक प्रसंग. क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या घट्ट नात्याचे असे अनेक प्रसंग इथं नेहमीच पाहायला मिळतात. अनेक क्रिकेटपटू बॉलिवूडमधील "स्टार्स'चे चाहते आहेत; तर स्टार मंडळी क्रिकेटपटूंचे "दीवाने' आहेत. यातूनच अनेकांची छान मैत्रीही झालीय. अभिनेता आमिर खान आणि सचिन तेंडुलकर यांच्यातलं नातं विलक्षण असंच म्हणावं लागेल.

आपला कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की आमिर तो आधी सचिनला दाखवतो. सचिनलाही सिनेमाचं वेड आहे. कोणते नवीन चित्रपट चांगले आहेत, याकडं त्याचं बारकाईनं लक्ष असतं. त्यामुळे क्रिकेटचा "सीझन' आटोपला की तो मग आपल्या "लिस्ट'मधील चित्रपट पाहण्यास सुरवात करतो. सचिनचं हे चित्रपटप्रेम आता बॉलिवूडलाही ठाऊक झाल्यानं निर्माते-दिग्दर्शक मंडळी त्याच्यासाठी आपल्या चित्रपटाचं एखाद्या "प्रीव्ह्यू थिएटर'मध्ये "स्पेशल स्क्रिनिंग' ठेवतात. असा मान अलीकडच्या काळातील दुसऱ्या कोणत्या क्रिकेटपटूला क्वचितच मिळालाय.
मध्यंतरी अभिनेत्री दीपिका पदुकोननं आपल्या "ओम शांती ओम'च्या "प्रीमियर शो'साठी महेंद्रसिंग धोनीला आमंत्रित केलं होतं. त्यामुळेच या दोघांमधील कथित "अफेअर'ची चर्चा बरेच दिवस रंगली होती.

"लगान'नं "चमकला' रुपेरी पडदा क्रिकेटचा प्रभाव चित्रपटांमधूनही अनेकदा पाहायला मिळालाय. अभिनेता-दिग्दर्शक देव आनंदच्या "ऑल राउंडर' चित्रपटात क्रिकेटचा विषय हाताळण्यात आला होता; परंतु देव आनंदचा हा पडता काळ असल्यानं आमिर खानसारखा कलाकार असूनही हा चित्रपट कोणाच्याही लक्षात राहिला नाही. क्रिकेटला चित्रपटमाध्यमातून मोठ्या उंचीवर नेलं ते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या "लगान' चित्रपटानं. या चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास म्हणजे क्रिकेटची मॅचच होती; परंतु, दिग्दर्शकानं क्रिकेटमधील बारकावे लक्षात घेऊन हा भाग असा काही रंगवला की, प्रेक्षकांना चित्रपटाऐवजी ती खरीखुरी मॅच वाटली होती. क्रिकेटवर आधारलेला बॉलिवूडमधील आणखी एक प्रभावशाली चित्रपट म्हणजे "इकबाल'. जलदगती गोलंदाज बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका मूकबधीर तरुणाची ही हृदय हेलावून सोडणारी कहाणी होती. दिग्दर्शक नागेश कुकनूरनं मूळ कथानकाशी क्रिकेटचा धागा खूप छान विणला होता. त्यामुळे एक "क्‍लासिक' चित्रपट म्हणून "इकबाल'ची गणना झाली. त्यानंतरही "हॅटट्रिक', "स्टम्प्ड्‌' असे काही क्रिकेटवर आधारलेले चित्रपट आले. परंतु, वर उल्लेखिलेल्या दोन चित्रपटांची सर काही त्यांना आली नाही.

लोकप्रियतेचा उपयोग "एक्‍सचेंज'साठीक्रिकेट आणि बॉलिवूड या दोन क्षेत्रांमध्ये मिळालेल्या लोकप्रियतेचा उपयोग मग "एक्‍सचेंज'साठी होतो. क्रिकेटमधले खेळाडू चित्रपटांमध्ये चमकतात. सुनील गावसकर, संदीप पाटील, अजय जडेजा, विनोदी कांबळी, सलील अंकोला यांसारखे खेळाडू वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये चमकले आहेत; परंतु, यापैकी कोणालाच तिथं "लॉंग इनिंग' खेळता आलेली नाही. खेळांडूप्रमाणे कलाकारांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थेट सहभाग घेतलेला नसला तरी ते वेगवेगळ्या मार्गांनी या खेळाशी निगडित आहेत. अमिताभ बच्चनसारखा कलाकार क्रिकेटसंदर्भातील जाहिराती करतो. खेळाडू आणि कलाकारांमधील एक "कॉमन' गोष्ट म्हणजे त्यांचं जाहिरातींमधील चमकणं. गेल्या पाच वर्षांमधील जाहिरातींमध्ये झळकलेल्या व्यक्तिमत्त्वांची संख्यात्मक तुलना करावयाचे ठरवल्यास अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, करिना कपूर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवर असल्याचं लक्षात येतं.

"स्टार प्रेक्षक'ही स्टेडियममध्येज्याप्रमाणं क्रिकेट चित्रपटांमधून दिसलं, त्याप्रमाणंच क्रिकेटमधून चित्रपटही नेहमीच पाहायला मिळतो. 1980 च्या दशकात "शारजा'मध्ये अनेक स्पर्धा व्हायच्या. त्या स्पर्धांमध्ये "बाउंड्री लाईन'वर लावण्यात आलेले जाहिरातफलक विशेषकरून लक्ष वेधायचे.
निर्माता-दिग्दर्शक फिरोज खाननं आपल्या "जॉंबाज' चित्रपटाची जाहिरात अशा स्पर्धांमधून करण्याची कल्पकता तेव्हा दाखविली होती. क्रिकेटवरील प्रेमाखातर अनेक चित्रपट स्टार्स वेळात वेळ काढून "लाईव्ह' मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतात. या वेळी या गॉगलधारी स्टार्सवर कॅमेऱ्याची नजर पडली नाही तरच नवल! कॅमेऱ्यानं या स्टार्सना टिपलं की मग "कॉमेंट्री बॉक्‍स'मधील सुनील गावसकर, रवी शास्त्री, हर्ष भोगले यांच्यासारखी मंडळी आपल्या शेजारी बसलेल्या विदेशी कॉमेंट्रीटर्सना या स्टार्सबद्दलची बहुमोल माहिती पुरवितात. ते ऐकणं अगदी रंजक असतं.

"आयपीएल'नं दूर केलं उरलंसुरलं अंतरक्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये जे काही थोडंफार अंतर शिल्लक राहिलं होतं, ते दूर केलं ते "आयपीएल' स्पर्धेनं. आतापर्यंत स्टार मंडळी कोणाच्या तरी "बेनिफिट मॅच'मध्ये आपल्या पायाला पॅड बांधून मैदानात उतरायचे; परंतु "आयपीएल'मुळं शाहरुख खानसारख्या "स्टार'नं "नेट प्रॅक्‍टिस' करताना पॅड बांधले आणि आपल्या संघातील चांगल्या गोलंदाजांना सामोरं जाण्याची संधी सोडली नाही. एका संघाचा मालक झाल्यामुळं सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गजावर तोंडसुख घेण्यापर्यंत त्यानं मजल मारली; परंतु त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया आल्यानंतर लगेचच त्यानं "यू टर्न' घेतला. शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा या अभिनेत्रींनी आपलं अभिनयातलं "करिअर' संपायला आलंय, हे वेळीच ओळखून क्रिकेटकडं मोर्चा वळवला. मात्र, दीपिका पदुकोनसारख्या अभिनेत्रीनं चतुराई दाखवीत विजय मल्ल्यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याबरोबर मैत्री वाढवीत सिनेमाबरोबरच क्रिकेटमध्येही लक्ष घालण्यास सुरवात केलीय. "आयटम सॉंग' फक्त चित्रपटांमध्येच असतं, हा गैरसमज "आयपीएल'नं दूर केला आणि गेल्या एक-दोन वर्षांमध्ये बॉलिवूडमधील तारका "चीअर-लीडर्स'च्या साह्यानं क्रिकेटच्या मैदानात थिरकताना दिसत आहेत. "आयपीएल'चा वाढणारा पसारा, क्रिकेटचे वाढणारे "फॉलोअर्स', भारतीय चित्रपटसृष्टीचा जगातील वाढणारा दबदबा लक्षात घेता मनोरंजन हा आता एक समुद्रच बनला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात त्यात क्रिकेटपटू आणि स्टार्सनी मोठ्या संख्येनं उड्या मारल्या तर आश्‍चर्य वाटायला नको. एक प्रेक्षक म्हणून त्यांच्या या समुद्रस्नानाचा आनंद आपल्याला निश्‍चितच मिळेल. तोही कामी कमी नाही!

                                                      - सदर लेख दै.सकाळ मधून संकलित केला आहे.

1 Comment:

प्रकाश पोळ said...

rohitrao chhan blog banavala aahe. maza blo paha sahyadri bana....

http://www.sahyadribana.com/

.

.

विद्रोही विचार मंच | संभाजी ब्रिगेड विचारपीठ