Tuesday, March 29, 2011

अणू आणि ऊर्जा धडकी भरवणारे प्रश्न.. उत्तरांच्या काही दिशा !

अणू आणि ऊर्जा धडकी भरवणारे प्रश्न.. उत्तरांच्या काही दिशा !

ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी दिलेल्या भरवशावर विश्वास ठेवून अणुऊर्जेचे समर्थन करावे, तर
जपानमधल्या भीषण आपत्तीचा ताजा अनुभव उरात धडकी भरवतो.
..आणि अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करावा, तर भविष्यातले विजेचे संकट कसे निवारणार, याचे उत्तर सापडणे कठीण होते.
- सर्वसामान्य माणसाची मती गुंग करणाऱ्या या कोड्याची गाठ निदान सैल करायची, तर
अन्य सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून शुद्ध विज्ञानाला शरण गेले पाहिजे.
...तोच प्रयत्न !


१९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले गेले आणि अणुऊर्जेच्या विक्राळ स्वरूपाचे दर्शन जगाला घडले. त्याच जपानमध्ये मार्च २०११ला झालेल्या ८.९ रिश्टर क्षमतेच्या भूकंपामुळे आणि त्यामुळे उदभवलेल्या त्सुनामीमुळे जपानमधील अनेक अणुभट्ट्यांना अपघात होऊन केवळ जपानलाच नव्हे तर चीन, रशिया, कोरिया, अमेरिका इत्यादि देशांनाही किरणोत्सर्गाच्या धोक्याला सामोरे जावे लागले. अशा वेळी एकंदरीतच अणुऊर्जा आणि तिचे धोके यांच्याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात.

अणुऊर्जा हानिकारक नाही का?
तसे पाहायला गेले तर कोणत्याही प्रकारची ऊर्जा घातक ठरू शकते. एखादी बाब घातक ठरते ती - ती मोठ्या प्रमाणावर तत्क्षणी निर्माण झाल्यामुळे. याला आपण विस्फोट म्हणतो. ऊर्जेच्या थोड्या थोड्या निर्मितीला आणि वापराला सामावून घेण्याचे तंत्र आपण विकसित केलेले असेल तर तेवढी ऊर्जा हानिकारक न होता लाभदायक म्हणता येईल. अणुऊर्जा ही माणसाने शोधून काढलेली ऊर्जा आहे. जानेवारी १९३९ मध्ये बर्लिनमधील केसर विल्हेम इन्स्टिट्यूटमध्ये ऑटो हान फ्रिटझ स्ट्रासमन आणि सहकार्यांनी प्रथम अणुविखंडन करून पाहिले. अणुऊर्जेसारखी दुसरी ऊर्जा म्हणजे 'आग'. ती माणसाला कधी सापडली याचा तारीखवार उल्लेख माहिती नाही. पण ती हजारो वर्षांपूर्वी माणसाला सापडली असावी असा अंदाज करता येतो. 'आग' सुरक्षितपणे हाताळता येण्यासाठी जितका कालावधी मनुष्यप्राण्याला लागला त्यामानाने अणुऊर्जा सुरक्षितपणे हाताळता येण्याइतकी परिस्थिती यायला अजून एक शतकही झालेले नाही. वाफ आणि वीज या शक्ती हाताळता येण्यासाठी त्यामानाने दोन शतके तीन शतके जास्ती मिळाली म्हणून आपल्याला या शक्ती तितक्या हानिकारक वाटत नाहीत; मात्र या ऊर्जा नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात होतच नाहीत असे म्हणता येत नाही. अपघात होतात; पण त्याचा 'बाऊ' न करता, न घाबरता आपण त्या ऊर्जा वापरतो. अणुऊर्जा त्या मानाने बाल्यावस्थेत आहे. ती नियंत्रणात ठेवण्याचे तंत्रज्ञान आणि ते वापरण्याचे कौशल्य अजून विकसित झाले तर घात-अपघाताने होणारी हानी रोखता येऊ शकेल.

अणुभट्ट्यांत अपघात झाले तर?
तो धोका आहेच. आपण किती कडेकोट बंदोबस्त करणे आवश्यक आहे ते त्या-त्या अणुभट्टीच्या भौगोलिक प्रदेशावर आणि आसमंतावर ठरेल. त्याबाबत विनाकारण गुप्तता बाळगणे योग्य नाही. गुप्ततेमुळे दोन धोके संभवतात. एक, लोकांमध्ये भयगंड वाढत राहू शकतो आणि दुसरा, संयंत्र उभारणीत फाजील (अति) आत्मविश्वास निर्माण होतो. पहिल्या अणुबॉम्ब निर्मितीत असणाऱ्या गाभा गटातील शास्त्रज्ञही अणुविखंडन तंत्रज्ञान गुप्त राहावे या बाजूने नव्हते. अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांचा डाव ते अमेरिकेपुरतेच राहावे असा होता, तो चक्क एका शास्त्रज्ञ जोडप्याने चोरी करून, ते तंत्रज्ञान रशियाला पुरवून हाणून पाडला. अणुऊर्जा निर्मितीबाबत गुप्तता पाळली गेल्याने त्यात भ्रष्टाचार तर होऊच शकतो शिवाय अपघात झाले तर त्यांची चौकशीही होऊ शकत नाही आणि त्यामुळे चुका सुधारण्यास शास्त्रज्ञांना-तंत्रज्ञांना संधी मिळत नाही, अपघात संभाव्य क्षेत्रात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या क्षणी काय करावे याचे धडे मिळत नाहीत. अणुऊर्जेच्या बाबतीत गुप्ततेचे आवरण काढले पाहिजे. दुसरे म्हणजे अपघाताचा धोका आहे म्हणून ते टाळले पाहिजे, असे काही मानवी संस्कृती सांगत नाही. असे धोके पत्करूनही आपल्या पूर्वजांनी आजची नागरी संस्कृती इथपर्यंत आणली याबद्दल सतत ऋणी राहण्याची मानसिकता जोपासली जावी.
अणुभट्टीतील राख लाखो वर्षं किरणोत्सार करीत राहील त्याचा धोका नाही का?
अणुभट्टीतून राख येते म्हणण्याऐवजी त्याला 'उर्वरक' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. औष्णिक भट्टीतून पसरणाऱ्या राखेचे लोटच्या लोट चंद्रपूर भागात आपल्याला दिसतात तसे अणुभट्टीतील उर्वरकांबाबत नसते. दुसरे म्हणजे अणुभट्टीत निर्माण झालेल्या उर्वरकांमध्ये किरणोत्सार करणारे अनेक घटक तयार होतात. किरणोत्सार कमी कमी होत जातो. किरणोत्साराचे प्रमाण ठराविक काळाने निम्म्यावर येते त्या काळाला अर्धआयुकाल म्हणतात. उदा. आयोडिन १३१ या किरणोत्सारी अणुप्रकाराचा अर्धआयुकाल आठ वर्षे आहे. याचा अर्थ किरणोत्सार १६ वर्षांनंतर संपतो असे नाही तर तो निम्मा होतो. साधारणपणे अर्धआयुकालाच्या सात पट कालापर्यंत किरणोत्सार प्रभावी असतो. म्हणजे वरील उदाहरणात तो ५६ वर्षं मानता येईल. लाखो वर्षं नाही; मात्र सैद्धान्तिकदृष्ट्या किरणोत्सार आधीचा निम्मा, त्याच्या निम्मा करत करत लाखच नव्हे कोटी वर्षंही तो राहू शकतो. त्याची काळजी घेतलीच पाहिजे. चेर्नोबिलच्या अपघातानंतर त्या भागातून भारतात आलेल्या किरणोत्साराने बाधित लोण्याबाबत एक खटला दाखल झाला होता तो इतका रेंगाळला की लोण्यातील किरणोत्सार धोकादायक पातळीच्या खाली आला. न्यायालयीन दिरंगाईचा फायदाच म्हणावा !

अणुऊर्जा सुरक्षित असेल तर गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अणुभट्ट्यांची उभारणी कमी का झाली?
एक तर ऊर्जानिर्मितीचे अन्य उपाय जे अधिक सुरक्षित किवा आखूड शिगी बहूदुधी - वाटले त्याकडे त्या त्या देशांनी लक्ष दिले. ते स्वाभाविकच आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अणुभट्टीतून वीजनिर्मितीनंतर शिल्लक राहिलेल्या उर्वरकामध्ये असणाऱ्या प्लुटोनियमची मागणी कमी झाली. प्लुटोनियमचा मुख्य वापर अणुबॉम्ब बनविण्यासाठी होतो. अणुबॉम्ब आहेत किवा इतरांपेक्षा जास्ती आहेत तो देश परकीय आक्रमणांपासून सुरक्षित अशी जरबेची समजूत बदलत्या जागतिक रचनेत फोल ठरली. उलट आपल्या भूमीवर असणाऱ्या अणुबॉम्बच्या ज्वालामुखीच्या तोंडावर आपण बसलो आहोत याची जाणीव त्या देशातील नागरिकांना आणि सरकारला व्हायला लागली. शिवाय शिल्लक उर्वरकाची विल्हेवाट लावण्याचे अन्य सुरक्षित मार्ग फारसे शोधले गेल्याचे दिसत नाही. खनिजातून कण कण गोळा करून शुद्ध करून तुळ्यांच्या रूपात वापरलेले अणुइंधन काम झाल्यावर पुन्हा कण कण करून विखरून निसर्गाला परत करणे - हा मार्ग खर्चिक असला तरी कमी धोक्याचा असावा, असे मला वाटते.

अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी किरणोत्सार लागतो आणि ती निर्माण झाल्यावरही किरणोत्सार होतो शिवाय ती खर्चिकही आहे - त्याचे काय?
घरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवायची तर त्याही आधी काही तरी पेटवायला लागतेच. आता सुरक्षित आगकाड्या, लायटर अशी साधने आहेत. त्यातही अग्नी आहे आणि चूल पेटविल्यावरही अग्नी निर्माण होतो. तसेच अणुऊर्जेबाबतही आहे. अणु हा पदार्थाचा अतिसूक्ष्म कण. तो इतका छोटा आहे की एका मिलीमीटरमध्ये एक कोटी अणु मावतात. त्या अणुत असणारे केंद्रक अणुच्या आकारापेक्षाही खूपच लहान. इतके लहान की एका अणुच्या आकारात एक लाख अणुकेंद्रके मावतील. त्या अणुकेंद्रकामध्ये धनभारीत प्रोटॉन असतात. त्यांच्यावरील विद्युतभार सारखाच असल्याने ते एकमेकांना तीव्र बलाने ढकलतात. त्या ढकलण्याच्या बलाच्या विरोधात जे बल प्रभाव टाकते ते म्हणजे अणुऊर्जा. ती प्रत्येक अणुत असतेच; पण प्रत्येक प्रकारचा अणु फोडून ही ऊर्जा मुक्त करता येत नाही. युरेनियम, थोरीयम, प्रोटेक्टॅनियम, प्लुटोनियम अशा प्रकारच्या अणुचेच विखंडन करणे आजपर्यंत माणसाला शक्य झाले आहे.

किरणोत्साराबद्दल थोडा वेगळा विचार करावा लागेल. आज तुम्ही, मी, आपणच काय तर प्रत्येक सजीव- किडामुंगी, प्राणी, वनस्पती अगदी सूक्ष्मजीवसुद्धा आपल्या देहात किरणोत्सारी मूलद्रव्य घेऊन वावरतो. त्याला कार्बन-१४ असे नाव आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत या कार्बन-१४ चे कार्बन-१२ शी असलेले प्रमाण स्थिर राहते. सजीवाचा मृत्यू झाला की कार्बन-१४ किरणोत्सारी असल्याने त्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. याशिवाय ज्या मूलद्रव्यांचे अणुविखंडन करून अणुऊर्जा मिळविता येते असे अणु आपल्या आसमंतात असतातच त्यांच्यापासूनही सातत्याने किरणोत्सार होत असतोच. सूर्यावर होणारी वादळे आणि इतर दूरवरच्या ताऱ्यांवरून फेकला जाणारा किरणोत्सारही असतोच. तो टाळता येत नाही. त्यातला काही किरणोत्सार सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यकही आहे.
दुसऱ्या बाजूने आधुनिक औषधोपचार पद्धतींमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण, सीटी स्कॅन, एमआरआय यासारख्या यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते. क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच.
तारापूर अणुवीज निर्मिती केंद्रातून गळती होते का, याची पाहणी करण्यासाठी तेथील सुरक्षितता तपासण्यासाठी काही खासदारांचे एक पथक गेले होते. त्या सर्वांना विशेष प्रकारची चिलखते घालून अणुभट्टीतून अनेक गोष्टी सुरक्षित अंतरावरून दाखविण्यात आल्या. ते पथक अतिसंरक्षित भागातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या शरीरावर पडलेल्या किरणोत्साराची मात्रा तपासण्यात आली. तपासणी नाका स्वयंचलित होता. किरणोत्सार मर्यादित असेल तरच दार उघडून बाहेर जाऊ देणार. तसे एक सोडून सर्व खासदार बाहेर जाऊ शकले. या खासदार महाशयांना तपासणी नाका बाहेर जाऊ देईना. कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा किरणोत्सार धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक होता. सगळे बुचकळ्यात पडले. शेवटी चौकशी करता असे समजले की, या खासदारांची काही दिवसांपूर्वीच अॅंजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी वापरलेल्या औषधींमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग अजूनही त्यांच्या शरीरात होता. ही धोकादायक मात्रा घेऊन या खासदारांनी किती जणांना किरणोत्साराचा प्रसाद दिला असेल? मला वाटते किमान तारापूर येथे तरी किरणोत्सार धोकादायक पातळीच्या वर जाणार नाही याची काळजी घेतली जाते.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल काय?
माझा कल एकंदरीतच महाकाय प्रकल्पांच्या बाजूने नाही. त्यात खर्च, गुंतवणूक, धोके, लाभांसाठी करावा लागणारी तजवीज, सुरक्षा यंत्रणा, उर्वरकांची विल्हेवाट, पर्यावरणीय हानी यांचा बोजा मोठा येतो. महाकाय प्रकल्पांचे तंत्र आणि त्यामागील विज्ञानाकडे चिकित्सक आणि संवेदनशील शास्त्रज्ञही साशंकतेने पाहतात. आपल्याकडे मनुष्यबळ प्रचंड आहे. त्याचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक वापर करणारे तंत्र आणि विज्ञान विकसित व्हायला पाहिजे. परावलंबनाच्या जोखडातून आपण, आपले शिक्षण, आपले विज्ञान, आपले तंत्रविज्ञान, आपले संशोधक, आपले शासन, प्रशासन मुक्त व्हायला हवे. सुटा सुटा विचार करून प्रश्न सुटत नाहीत. एकात्मिक विचार व्हायला हवा.
जपानी नागरिकांसारखी पुन्हा उभारी घेण्याची मानसिकता आपल्यात निर्माण झाली तर आपली 'ऊर्जा' कितीतरी जबर असेल.

- विनय र. र.
(vinay.ramaraghunath@yahoo.com )
सदर लेख दै. 'लोकमत' मधून संकलित केला आहे.

0 Comments:

.

.

विद्रोही विचार मंच | संभाजी ब्रिगेड विचारपीठ